गंगापूर (प्रतिनिधी): शहरातील बेकायदेशीर मटका व्यवसायाविरोधात गंगापूर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, कॅल्क्युलेटर आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील राजीव गांधी चौकाजवळील जुने बसस्थानक परिसरात कैलास टी सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना मुंबई मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी छापा टाकून दिलीप बळवंत घाडगे, नवनाथ अंकुश कुंडाळकर आणि सुरेश शंकर फुलारे या तिघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत रोख २ हजार २५० रुपये, तीन मोबाईल फोन, तीन कॅल्क्युलेटर, पेटीएम स्कॅनर, पावती
बुक, पेन व इतर साहित्य असा एकूण २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस
अंमलदार राजेंद्र भिमराव बंडे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५५/२०२६ दाखल
करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल झोरे, पोलीस अंमलदार पदमकुमार जाधव, पोलीस हवालदार अमित पाटील तसेच विठ्ठल जाधव, विष्णू बापते, संदीप नागरे, दौलत आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत. शहरातील अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे गंगापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.










